Heavy Rainfall: भीमाशंकर खोऱ्यात मुसळधार पाऊस! कोंढवळ-तेरुंगणमध्ये भातशेती अन् रस्ते वाहून गेले
Heavy Rainfall: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यात मुसळधार पाऊस; भातखाचरे आणि शेतबांधांचे प्रचंड नुकसान.

Heavy Rainfall – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाचा कोंढवळ व तेरुंगण परिसराला मोठा फटका बसला. पावसामुळे भातखाचरे, शेतबांध, ग्रामीण रस्ते व मोऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अचानक पावसाचा जोर वाढल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले.
डोंगर उतारावरून आलेल्या पाण्यामुळे रस्त्यांवर माती, दगड व झाडे आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तेरुंगण गावठाण ते वनदेव परिसर तसेच कोंढवळ गावठाण भागातील मोऱ्यांचे कठडे तुटले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून शेतजमिनीत पाणी शिरले. रस्त्यालगतचे बांध फुटल्याने भातखाचरांतील माती व पिके वाहून गेली.
ऐन भातशेतीच्या हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाहून गेलेले बांध व खाचरे पूर्ववत करण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी काळू डामसे, शांताराम कारोटे, ज्ञानेश्वर कारोटे आणि महादू वाजे यांनी केली आहे.





