Electrocution Death: बांधकामावर पाणी मारताना काळाचा घाला! वळती येथील ४५ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
Electrocution Death: आंबेगाव तालुक्यातील डीजे व्यवसायात निर्माण केली होती स्वतंत्र ओळख; अपघातानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित.

Electrocution Death- वळती (ता.आंबेगाव) येथील बेनकेमळा येथे घराच्या बांधकामादरम्यान पाणी मारण्यासाठी गेलेल्या कैलास जिजाभाऊ बेनके (वय ४५) यांचा विजेचा धक्का लागून रविवार, दि.२७ रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास बेनके हे घराच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला.
या घटनेनंतर त्यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कैलास बेनके हे आंबेगाव तालुक्यातील डीजे क्षेत्रातील परिचित तरुण होते. आपल्या कामातून त्यांनी या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच वळतीसह आंबेगाव तालुक्यातील मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांनी दुःख व्यक्त केले. कैलास बेनके यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळंब-रांजणी जिल्हा परिषद गटप्रमुख बारकू बेनके यांचे ते धाकटे बंधू होत. त्यांच्या निधनामुळे बेनके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून वळती परिसरात शोककळा पसरली आहे.





