Chandrima Bhattacharya : ममतांवरच राजकीय संकट थांबेना! अत्यंत विश्वासू महिला नेत्याने सोडली साथ; तडकाफडकी दिला सगळ्या पदांचा राजीनामा
Chandrima Bhattacharya : चंद्रिमा भट्टाचार्य या तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ आणि प्रभावी नेत्या मानल्या जातात.

Chandrima Bhattacharya : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षातील अत्यंत विश्वासू नेत्या आणि ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पक्षातील सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे टीएमसीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रिमा भट्टाचार्य (Chandrima Bhattacharya ) यांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. या पत्रात त्यांनी केवळ संघटनात्मक पदांचाच राजीनामा दिला नसून, पक्षाच्या आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहारांशी संबंधित महत्त्वाच्या ‘स्वाक्षरी अधिकारी’ (Signing Authority) पदाचाही तात्काळ राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्या आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्रीपदावर कायम आहेत; त्यांनी केवळ पक्षातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. (Chandrima Bhattacharya)
चंद्रिमा भट्टाचार्य या तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ आणि प्रभावी नेत्या मानल्या जातात. पक्ष संघटना आणि सरकार या दोन्ही स्तरांवर त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजीचा विस्फोट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Chandrima Bhattacharya)
दरम्यान, या प्रकरणावर तृणमूल काँग्रेस किंवा ममता बॅनर्जी यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, टीएमसीसमोरील आव्हाने आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Monsoon Health: पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाचा धोका का वाढतो? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि बचावाचे उपाय
कोण आहेत चंद्रिमा भट्टाचार्य? (Chandrima Bhattacharya)
चंद्रिमा भट्टाचार्य या पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (टीएमसी)च्या वरिष्ठ नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. पक्ष संघटना आणि राज्य सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
- २०११ पासून त्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या सदस्या आहेत.
- पश्चिम बंगाल सरकारमध्ये त्यांनी अर्थ (राज्य), आरोग्य, जमीन व जमीन सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
- सध्या त्या राज्याच्या वित्त राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यरत आहेत.
- टीएमसीमध्ये त्या दीर्घकाळापासून महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळत होत्या आणि पक्षाच्या आर्थिक व प्रशासकीय निर्णयांमध्ये त्यांचा प्रभाव होता.
- ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती नेत्या म्हणून त्यांची ओळख असून, पक्षातील महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग राहिला आहे.






