Raj Thackeray: “भाजपच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला…”; राज ठाकरेंची पोस्ट; फडणविसांना केले महत्त्वाचे आवाहन
Raj Thackeray: उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांवरून अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही मुंबई महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली

Raj Thackeray : मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी झाडपडीच्या घटनाही घडल्या. चेंबूरमध्ये २९ जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
तर साकीनाका येथे २ जुलै रोजी एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांवरून अधिवेशनात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही मुंबई महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. (Raj Thackeray)
त्यानंतर आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि एकच वाद सुरू झाला. विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) जयंत पाटील यांच्याशी हास्यविनोद करताना दिसले. या विषयांचा उल्लेख करताना अमित साटम “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं…” असे म्हंटले.
यावर दोन्ही नेते हसत असल्याचे दिसते. यावर घटनेवर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फेसबुकवर पोस्ट लिहीत कारवाई मागणी केली आहे. (Raj Thackeray)
राज ठाकरेंची पोस्ट (Raj Thackeray)
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे.”
पुढे ते म्हणाले, “तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.” (Raj Thackeray)
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकारणाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. (Raj Thackeray)
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.” (Raj Thackeray)
“आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही. (बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?, ” असा सवालही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणविसांना केला. (Raj Thackeray)
View this post on Instagram
बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घेण्याची मागणी (Raj Thackeray)
महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडू नये, यासाठी राज ठाकरेंनी फडणवीसांना आवाहन केले आहे. “तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील. तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत,” असे शेवटी पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले.
अमित साटम यांचे स्पष्टीकरण (Raj Thackeray)
व्हायरल व्हिडीओवरून टीका झाल्यावर आमदार अमित साटम यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न होत आहे. मॅनहोलच्या संदर्भात आमची चर्चा सुरू असताना जयंत पाटील त्याठिकाणी आले. त्यांनी म्हटले की, काल मी सभागृहात यासंदर्भात भाषण केले होते. त्यावर मी त्यांना म्हणालो की, काल झाड पडल्याबाबत बोललो होतो, आज मॅनहोलसंदर्भात माणूस पडल्याबाबत बोललो. त्यावर त्यांनी हसून दाद दिली आणि माझ्या पाठीवर थाप मारून ते निघून गेले. त्यानंतर मीही त्यांना स्मितहास्य करत प्रतिसाद दिला,” असे स्पष्टीकरण देत अमित साटम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा:





