ममतांनी मोदींना अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन् निघून गेल्या

नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. मात्र, मोदी यांच्याबरोबरच्या आढावा बैठकीपासून त्या दूर राहिल्या. त्यामुळे संतापलेल्या भाजपने ममतांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
ओडिशा आणि बंगालला यास चक्रीवादळाने नुकताच तडाखा दिला. त्यामुळे स्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी दोन्ही राज्यांचा दौरा केला. बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर मोदी आणि ममता यांच्यात प्रथमच भेट होणार असल्याने त्या घडामोडीचे महत्व वाढले.
बंगालमधील स्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर मोदी यांचे विमान एका तळावर उतरले. तिथे ममतांनी मोदी यांची भेट घेतली. सुमारे 15 मिनिटांच्या त्या भेटीत ममता यांनी नुकसानीचा अहवाल मोदींकडे सोपवला. चक्रीवादळामुळे बंगालमध्ये तब्बल 20 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले. तेवढ्या मदतीचे पॅकेज केंद्र सरकारने उपलब्ध करावे, अशी मागणी ममतांनी केली.
त्या भेटीनंतर झालेल्या आढावा बैठकीत ममता सहभागी झाल्या नाहीत. त्या बैठकीत मोदींबरोबरच बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, भाजप नेते सुवेंदू अधिकारी सहभागी झाले. बैठकीला ममता अनुपस्थित राहिल्याने केंद्र सरकारमधील सुत्रांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. ममता येतील या अपेक्षेने मोदी आणि धनखड यांनी अर्धा तास प्रतीक्षा केली.
ममतांची वर्तणूक निषेधार्ह आहे, असे त्या सुत्रांनी म्हटले. तर, बैठकीआधी झालेल्या भेटीवेळी ममतांनी पूर्वनियोजित बैठकीसाठी जायचे असल्याचे सांगून मोदींची परवानगी घेतल्याचे बंगाल सरकारमधील सुत्रांकडून सांगण्यात आले.
बंगाल निवडणुकीतील प्रचारावेळी ममता आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. त्यापार्श्वभूमीवर, आढावा बैठकीपासून ममता दूर राहिल्याने निवडणुकीवेळी निर्माण झालेली कटूता संपलेली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.





