पंतप्रधानांनी शहांवर फार विश्वास ठेवू नये : ममता

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कृत्ये ते देशाचे कार्यवाहक पंतप्रधान असल्यासारखी आहेत असा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला. पूरग्रस्त उत्तर बंगालमधून परतल्यानंतर कोलकाता विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नये अशी विनंती त्या पंतप्रधानांना करू इच्छितात. शहा एक दिवस त्यांचे मीर जफर बनू शकतात अशी बोचरी टिप्पणीही त्यांनी केली.
दरम्यान, मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा लागू करण्याच्या नावाखाली निवडणूक आयोग जे काही करत आहे, ते शहा यांच्या इशाऱ्यावर केले जाते आहे, आणि हे शहा कार्यवाहक पंतप्रधानांसारखे वागत आहेत. दुर्दैवाने, पंतप्रधानांना त्यांच्या सर्व कृत्यांची जाणीव आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांचा नेता एक बैठक घेतो आणि बंगालच्या मतदार यादीतून लाखो नावे वगळण्याचे सांगण्यासाठी येथे येतो.
आपण सध्या नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊसइत्यादी समस्यांना तोंड देत आहोत. एसआयआरची प्रक्रिया पंधरा दिवसांत पूर्ण होऊ शकते का आणि सध्याच्या परिस्थितीत त्या काळात नवीन नावे अपलोड करता येतील का? निवडणूक आयोगाने भाजप पक्षाच्या इशाऱ्यावर काम करावे की लोकशाही हक्क आणि लोकांच्या नागरी हक्कांच्या हितासाठी काम करावे असा सवाल त्यांनी केला.
भाजपवर या देशाचा नाश करण्याचा आरोप करत, बॅनर्जी यांनी पक्षाला कायमचा सत्तेतून बाहेर जाण्याचा इशारा दिला. मी माझ्या आयुष्यात अनेक सरकारे पाहिली आहेत, पण अशा प्रकारची अहंकारी आणि हुकूमशाही राजवट मी कधीही पाहिली नाही, असेही त्या म्हणाल्या.





