Pimpri : आमदारांचा लोणावळा नगरपरिषदेवर हल्लाबोल

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारावर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांमुळे संतप्त झालेल्या आमदारांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील विकासकामांतील दिरंगाई आणि निष्क्रिय प्रशासन यावर त्यांनी आढावा बैठकीत सडकून टीका केली.
भांगरवाडी उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या विलंबावर त्यांनी नाराजी व्यक्त केली, तर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक असलेला डीपीआर अद्याप तयार न झाल्याने त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.खंडाळा परिसरात विद्यार्थ्यांसाठी नव्या शाळेच्या जागेच्या भूसंपादनात काहीजण राजकारण करत असून त्यामुळे शिक्षणाचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोपही आमदार शेळके यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळणं म्हणजे समाजविघातक कृत्य आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीत नगरपरिषदेचा कारभार अत्यंत निराशाजनक असल्यचेही स्पष्ट केले. येत्या १ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर सभा घेऊन कामांचा लेखाजोखा विचारणार असल्याचा इशारा दिला.
शहरात वाढत असलेल्या अवैध धंदे आणि अंमली पदार्थांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी पोलिसांना केली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ५० नवीन ट्रॅफिक वॉर्डन्सची नियुक्ती लवकरच करण्यात येईल. नागरिकांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. जर प्रशासनाने योग्य काम केलं नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरण्यास देखील तयार आहोत, असा स्पष्ट इशाराही शेळके यांनी दिला.





