Pune District :डिंभे धरण पुनर्वसनसंदर्भात गुरुवारी आढावा बैठक

मंचर – आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण पुनर्वसनासंदर्भात प्रलंबित असणाऱ्या सोयीसुविधासाठी गुरुवार दि. १० रोजी सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत घोडेगाव तहसील कार्यालय येथे आढावा बैठक होणार आहे,अशी माहिती धरणग्रस्तांचे नेते प्रकाशराव घोलप यांनी दिली.
जिल्हा पुनर्वसन अधिकारी,प्रांत आंबेगाव, तहसीलदार आंबेगाव, पुनर्वसन तहसीलदार,गट विकास अधिकारी आंबेगाव,कार्यकारी अभियंता जलसंपदा, अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घोडेगाव येथे होणार आहे. या अगोदर पुणे येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत धरण ग्रस्तांच्या पुनर्वसन समस्यांबाबत बैठक झाली.असे सांगून प्रकाशराव घोलप म्हणाले, कोलतावडे, कळंबई, दिगद या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्याबाबत स्वतः जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्णय घेण्याबाबत विभागीय आयुक्त यांना विनंती केली आहे.
पुनर्वसनग्रस्तांना स्वतःच्या जमिनी मोजून घेता येत नाहीत. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कळंबई येथील लोकांच्या जमिनीची फाळणी बारा करून मोजणी करण्यात येणार आहे. पुनर्वसन झालेल्या सर्व गावांचा तातडीने सिटी सर्वे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या असून त्यासाठी लागणारी सर्व फी देखील जिल्हाधिकारी स्तरावरूनच भरण्याची सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत.
सहा पुनर्वसन गावात १८ नागरी सुविधा देण्याबाबत देखील जलसंपदा व महसूल विभागाला सूचना दिल्या आहेत. सहापैकी ज्या ठिकाणी या सुविधा देण्यासाठी जमीन उपलब्ध नाही.त्यासाठी तातडीने जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना जलसंपदा व महसूल विभागाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले.धरणग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्या मार्गी लावण्यासाठी घोडेगाव येथे गुरुवार, दि.१० रोजी बैठकीचे आयोजन केले आहे.असे त्यांनी सांगितले.





