Mamata Banerjee : ममतांच्या तृणमूलचा अमित शहांवर पलटवार; राजीनाम्याची केली मागणी

Amit Shah | Mamata Banerjee : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेवरून तृणमूल कॉंग्रेसने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील त्या पक्षाने शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. शहा यांनी रविवारी बंगालचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी ममता आणि तृणमूलवर टीकेची झोड उठवली.
तृणमूल सरकार अवैध घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहा यांच्या टीकेचा समाचार घेण्यासाठी तृणमूलच्या प्रमुख महिला नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
सीमेपलिकडून होणारी घुसखोरी रोखण्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलावर (बीएसएफ) आहे. ते दल शहांच्या अखत्यारीत कार्य करते. घुसखोरी रोखण्याची जबाबदारी तृणमूल सरकारची नाही.
मात्र, आमच्यावर आरोप करून शहा स्वत:चीच अकार्यक्षमता सिद्ध करत आहेत. त्यांनी राजीनामा द्यायला हवा. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडला. त्यातून सुरक्षा आणि गुप्तचरविषयक त्रुटी उघड झाल्या. तो हल्ला घडवणारे दहशतवादी अद्याप हाती लागलेले नाहीत.
राष्ट्रीय सुरक्षा स्थिती खालावण्याला शहा यांना जबाबदार धरायला हवे, असा शाब्दिक हल्लाबोल महिला नेत्यांनी केला. ममतांच्या नेतृत्वाखाली तृणमूल सलग चौथ्यांदा बंगालची सत्ता मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





