Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ‘एवढ्या’ जागा जिंकू; ममता बॅनर्जींनी व्यक्त केला विश्वास
आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (Mamata Banerjee) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) मंगळवारी आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली.

Mamata Banerjee : आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (Mamata Banerjee) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) मंगळवारी आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर असून तृणमूल कॉंग्रेस राज्यातील 294 पैकी 291 जागांवर आपले उमेदवार देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कोलकाता येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा करताना म्हटले की, 2026 च्या या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतासह सत्ता राखेल आणि किमान 226 हून अधिक जागांवर विजय मिळवेल.
दार्जिलिंगच्या पर्वतीय भागातील उर्वरित तीन जागांवर अनित थापा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा (बीजीपीएम) हा तृणमूलचा मित्रपक्ष निवडणूक लढवणार आहे.
पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर करताना त्यांच्यासोबत राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि प्रदेशाध्यक्ष सुब्रत बक्षी उपस्थित होते. ज्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना यावेळी उमेदवारी मिळालेली नाही, त्यांना पक्ष संघटनेत योग्य ती जबाबदारी देऊन सामावून घेतले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले.
केंद्राचे जनविरोधी धोरण
विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, केंद्राच्या जनविरोधी धोरणांमुळे या निवडणुकीत भाजपच्या जागांची संख्या मोठी घटलेली पाहायला मिळेल. जनतेचा कौल तृणमूलच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. तृणमूल काँग्रेस या निवडणुकीत सलग चौथ्यांदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असून, या उमेदवारी घोषणेमुळे राज्यातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे.






