Mallikarjun Kharge : ‘पंतप्रधान मोदी चूक मान्य करण्यास तयार नाहीत’ – मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या वक्तव्यातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार ती चूक मान्य करण्यास तयार नाहीत. शहांचा राजीनामा मागण्याऐवजी आणि त्यांना माफी मागण्यास भाग पाडण्याऐवजी त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन केले जात आहे, असा शाब्दिक हल्लाबोल कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरूवारी केला.
नव सत्याग्रह बैठक या नावाने कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कर्नाटकच्या बेळगावमध्ये झाली. त्यामध्ये बोलताना खर्गे यांनी काही दिवसांपूर्वी शहांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्याचा विषय उपस्थित केला. त्या वक्तव्यावर आम्ही जोरदार आक्षेप घेतला. निदर्शने केली. आता देशभरात निदर्शने होत आहेत.
मात्र, मोदींनी शहांचा बचाव करण्याच्या उद्देशातून निवेदन जारी केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला गेला. त्यातून आजच्या सत्ताधाऱ्यांचा राज्यघटना आणि तिचे शिल्पकार असणाऱ्यांविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. मात्र, आम्ही डॉ.आंबेडकर यांच्या सन्मानासाठी, गांधी-नेहरू विचारसरणीच्या समर्थनासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सध्या घटनात्मक संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत, असा आरोप करत खर्गे यांनी निवडणूक आयोगाचे उदाहरण दिले. आयोगाच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास हळूहळू कमी होऊ लागला आहे. ती अतिशय चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच निवडणूक नियमांत बदल करण्यात आला. न्यायालयाने काही माहिती उघड करण्याचा आदेश दिला. मात्र, ते रोखण्यासाठी नियम बदलाचे पाऊल उचलले गेले. काय दडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा सवाल त्यांनी केला.
नववर्ष पक्षसंघटनेला मजबूत बनवणारे
नववर्ष (२०२५) कॉंग्रेस पक्षसंघटनेला मजबूत बनवणारे असेल. संघटनेतील सर्व रिक्त जागा भरल्या जातील. निवडणुका जिंकण्यासाठी लागणारे कौशल्य पक्षसंघटनेला प्रदान केले जाईल. विचारसरणीवर निष्ठा असणाऱ्यांचा शोध पक्षाला घ्यावा लागेल. कॉंग्रेसच्या आयडिया ऑफ इंडियावर विश्वास असणाऱ्यांना जोडावे लागेल. त्यांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल.
तसेच, संघटनात्मक कार्यात सहभागी करून घ्यावे लागेल. केवळ कठोर मेहनत पुरेशी नाही. वेळीच ठोस रणनीतीचा अवलंबही गरजेचा आहे. नव्या नेतृत्वाचे संगोपन होण्याची आवश्यकता आहे, असे खर्गे यांनी अधोरेखित केले.





