Khalapur News : खालापूरमध्ये संताप! निकृष्ट रस्तेकामाविरोधात ग्रामस्थांचा तहसीलवर मोर्चा; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Khalapur News : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटींचा आरोप; शिरवली ते तळाशी मार्गावर ४५० कुटुंबांचा प्रवास झाला धोकादायक.

Khalapur News – शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध गावांना जोडणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण, संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.
शिरवली, तळाशी, ढेबेवाडी, बर्गेवाडी, वळवण, रानसई आदिवासीवाडी आणि रानसई धनगरवाडा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले होते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे खोदकाम करून काही भाग अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले असून अनेक मोऱ्यांची कामे अपूर्ण आहेत.
खोदकामातील माती रस्त्यालगत टाकून दिल्याने पावसाळ्यात ती शेतात आणि घरांमध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच उताराच्या ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने वाहनचालकांसाठी प्रवास धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, सरपंच महेश पाटील, उपसरपंच गीता बांदल, ग्रामपंचायत सदस्य संदीप मोरे, रामदास जाधव, दिपाली जाधव,
तंटामुक्ती अध्यक्ष विलास पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात धडक देत नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन दिले. शिरवली ते तळाशी हा रस्ता सहा गावे आणि वाड्यांतील ग्रामस्थ वापरत असून सुमारे ४५० कुटुंबांचे दळण-वळण या मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.
“पावसाळ्यात या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करताना उताराच्या ठिकाणी अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्ता खोदून अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डोंगर फोडून काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने भूस्खलन होऊन घरांचे तसेच जीविताचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.”
– महेश पाटील, सरपंच, शिरवली ग्रामपंचायत
“रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी असून निकृष्ट साहित्य वापरले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. शासनाच्या निधीचा अपव्यय थांबवून तातडीने चौकशी करावी.”
– प्रमिला पाटील, सदस्या, पंचायत समिती खालापूर





