Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे पूर्ण! 151 दिवंगतांना सामूहिक श्रद्धांजली; नातेवाईकांचे डोळे पाणावले
Malin Landslide: विवेक वळसे पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती; दुर्घटनेतील जुन्या आठवणींनी परिसर झाला भावूक.

Malin Landslide – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील माळीण येथील भीषण भूस्खलन दुर्घटनेला गुरुवारी (दि. 30) बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात आले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 151 नागरिकांना स्मृतिस्तंभाजवळ सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित नातेवाईक, महिला आणि युवक जुन्या आठवणींनी भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दुर्घटनास्थळी उभारलेल्या स्मृतिस्तंभाजवळ आयोजित कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी सभापती संजय गवारी, पंचायत समिती सदस्य निलेश टेमकर, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विवेक वळसे पाटील यांनी दुर्घटनेनंतर विविध सहकारी संस्था, सामाजिक संघटना आणि प्रशासनाने मानवतेच्या भावनेतून मदतकार्य उभारल्याचे सांगितले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसनासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यामुळे पुनर्वसनाची कामे अल्पावधीत पूर्ण झाली. ग्रामस्थांनी सुचविलेली उर्वरित विकासकामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात ग्रामस्थांनी पुनर्वसित घरांतील गळतीची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, गावातील पाणीपुरवठा योजना तसेच शेतीसाठी सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना तातडीने राबविण्याची मागणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी 151 दिवंगतांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.





