Pune District : मलाई कुल्फी खाताय, सावधान!
Pune District : या प्रकरणी उद्योगाचे अन्न नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील कांदळी (नगदवाडी-14 नंबर) येथील संचिता फुड्स उद्योगावर अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी (दि. 28) पहाटे धडक कारवाई करत अस्वच्छ परिस्थितीत तयार होत असलेल्या मलाई कुल्फीचे दोन नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी जप्त केले. तसेच मानवी आरोग्याला संभाव्य धोका लक्षात घेऊन सुमारे 19 हजार 140 रुपये किमतीचा 47.85 किलो मलाई कुल्फीचा साठा नष्ट करण्यात आला. या प्रकरणी उद्योगाचे अन्न नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुरज वाजगे, ग्रामस्थ तसेच नारायणगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पहाटे दोनच्या सुमारास उद्योगाची तपासणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत, स्वाती मस्के, लक्ष्मीकांत सावळे आणि अभिजीत झोडगे यांनी उत्पादन सुरू असतानाच पाहणी केली. तपासणीदरम्यान कुल्फी तयार करण्यात येत असलेल्या शेडमध्येच फिनेल, लिक्विड फ्लोअर क्लीनर आणि इतर रासायनिक पदार्थांचे उत्पादन व साठवणूक होत असल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्नपदार्थांचे उत्पादन रासायनिक पदार्थांच्या उत्पादनापासून पूर्णपणे वेगळ्या, सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणी करणे बंधनकारक असताना या उद्योगात मूलभूत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
उत्पादन परिसरात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता आणि अन्न हाताळणीसंबंधी निकषांचे पालन न झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित उद्योगाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित केले. जप्त करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) संजय चट्टे तसेच पुणे विभागाचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संशयास्पद किंवा अस्वच्छ परिस्थितीत तयार होणार्या अन्नपदार्थांबाबत नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सूरज वाजगे यांच्या पुढाकारातून कारवाई
नारायणगाव येथील समाजसेवक सूरज वाजगे यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान अन्नभेसळीसाठी वापरली जाण्याची शक्यता असलेली काही रसायने व इतर साहित्यही प्रशासनाने हस्तगत केले. दरम्यान, कारवाईची चाहूल लागताच कारखानदार आणि काही कामगार घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती सूरज वाजगे यांनी दिली.





