पुणे | शाळांत वैद्यकिय व्यवस्था उपलब्ध ठेवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील.
त्यामुळे विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहकाऱ्यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीच्या याकामी काळात वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.
यानुसार शाळेमध्ये प्रथमोपचाराकरीता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. संचालक, उपसंचालकांनी मासिक आढावा व आवश्यतेनुसार शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना मागदर्शन करावे लागणार आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी आठ आठवड्यांच्या आत शासनास कार्यपूर्तता अहवाल सादर करावा तसेच प्रतिवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात याबाबतच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन शासनास एकत्रित अहवाल सादर करावा, अशा सूचना अवर सचिव प्रवीण मुंढे यांनी दिल्या आहेत.
उपाययोजनांबाबत सूचना…
शाळेत आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात.
वर्षांत एकदा वैद्यकीय तपासणी शिबीर घ्यावे.
तातडीचे प्रथमोपचार देणेबाबत प्रशिक्षिण देण्यात द्यावे.
रूग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावेत.
विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास वाहन असावे.
विद्यार्थ्यांकरीता तणावमुक्तीसाठी कार्यशाळा घ्यावी.
विद्यार्थ्यांना समुपदेशकाची व्यवस्था करणे आवश्यक.
शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमावे लागणार.





