Pune : प्रजासत्ताक दिन, असा करा साजरा

पुणे : प्रजासत्ताक दिन हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मुल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या देशाची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्या अनुषंगाने दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, नृत्य यासारखे उपक्रम घेऊन साजरा करावा लागणार आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
सूचनांप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा होईल यासंदर्भात संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी काळजी घ्यावी. सूचनांचे पालन शाळा करतील याची दक्षता शिक्षण आयुक्त यांनी घ्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी जारी केले आहे.
शाळांना करण्यात आलेल्या सूचना…
– स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक आदींचा सहभाग असावा
– विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन करावे
– राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन करावे
– परिसरात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढावी
– देशभक्ती, लोकशाही विषयांवर भाषण स्पर्धा ठेवावी
– देशभक्तीपर कविता, गाण्यांवर नृत्य स्पर्धा ठेवावी
– देशभक्तीपर विषयांवर चित्रकला स्पर्धा करावी
– स्वातंत्र्य लढा आदी विषयांवर निबंध लिहिण्याची स्पर्धा ठेवावी
– हस्तकला, चित्रकला इत्यादींची प्रदर्शनी आयोजित करावी





