पुणे | शिक्षक भरतीसाठी एसओपी विकसित

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शालेय शिक्षण विभागाच्या वतीने पवित्र पोर्टलअंतर्गतच्या खासगी अनुदानित संस्थांमध्ये मुलाखतीद्वारे शिक्षक पदभरती करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) विकसित करण्यात आली आहे. ती शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे.
मुलाखतीद्वारेची शिक्षक भरती गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल. यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये उमेदवारांच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या- त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये एकूण ३,३०६ रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. ते प्राधान्यक्रम विचारात घेऊन उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या आधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
स्व-प्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीसाठी शिफारशी होत आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांना पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क करावा लागेल.
नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील १० टक्के रिक्त ठेवलेल्या जागांसाठी स्वतंत्र फेरी होणार आहे.





