Belagavi Dispute : ‘बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा’ – आदित्य ठाकरे

मुंबई – बेळगाव हे केंद्रशासित करण्यासाठी ठराव आणून तो केंद्राकडे पाठवा. या ठरावाला आम्ही एकमताने मंजूरी देवू. कारण हा ठराव महाराष्ट्र आणि बेळगावातील मराठी जनतेसाठी महत्त्वाचा आहे. तिकडचे स्थानिक लोक हे हिंदू आहे. अशावेळी काही लोक आपल्याकडे येऊन आपल्याला बटेंगे तो कटेंगे वगैरे सांगतात, हे लोक बेळगावातील प्रश्नावेळी जातात कुठे?, असा हल्लाबोल ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात याही वर्षी महाअधिवेशनाचे आयोजन केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने त्यावर बंदी घातली असून एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर ताशेरेही ओढले.
आदित्य ठाकरे म्हणाले, बेळगावप्रश्नी शिवसेना ठाकरे पक्षाच्या काही नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली असून अटक करण्यात आली आहे. तसेच स्थानिक जनतेवर यापुढे लाठीचार्जही होऊ शकतो. हे कुठेही न चिघळता, केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि मोदींनी तिथे केंद्रशासित राज्य जाहीर करावे, असे आवाहन ठाकरेंनी केले.
याचवेळी त्यांना विचारण्यात आले की, यापूर्वी शिवसेनेचे नेते बेळगावात पोहचले होते आणि तिथे जाऊन कार्यक्रम केला होता. त्यामुळे आता पुन्हा गरज भासल्यास जाणार का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, जर आम्ही आताच सांगितलं तर आमची अडवणूक करण्यात येईल, असे उत्तर दिले.





