मतमोजणी केंद्रात मोठा राडा! राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आत्महत्येची धमकी; वाचा नेमकं काय घडलं?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – प्रभाग क्रमांक ४० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळा कवडे आणि गंगाधर बधे यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत मोजणी थांबविण्याची मागणी केली. यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ तणाव, गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केलेल्या सात तक्रारींपैकी सहा तक्रार अर्ज फेटाळण्यात आले. एका अर्जानुसार केलेल्या पुनर्मोजणीत कोणतीही तफावत आढळली नाही.
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४० (कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी) मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांनी विजयाच्या दिशेने आघाडी घेतली होती. मोजणीदरम्यान मतदान यंत्रांचा क्रम बदलल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार बाळा कवडे यांनी केला. तसेच भाजप उमेदवारांना समान मते कशी मिळतात, असा सवाल उपस्थित करत मतदान प्रक्रियेत फेरफार झाल्याचा दावा केला. या प्रकारामुळे केंद्रात गोंधळ उडाला.
संतापलेल्या कवडे यांनी आत्महत्येची धमकीही दिली.याचवेळी गंगाधर बधे यांनी मतमोजणीवेळी अ, ब, क आणि ड या क्रमाने यंत्रे लावणे अपेक्षित असताना, तो क्रम बदलल्याचा आरोप केला. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आपला अर्ज स्वीकारत नसल्याची तक्रार त्यांनी केली. सपना धर्मावत आणि अलका बधे या उमेदवारांनीही आक्षेप नोंदविले. कवडे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.
परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांनी संबंधित उमेदवारांना मतमोजणी केंद्राबाहेर नेल्याने वातावरण काहीसे शांत झाले.निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर जव्हाड यांनी सांगितले की, आमच्याकडे एकूण सात तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी सहा तक्रारी मतदान प्रक्रियेशी संबंधित होत्या. त्या मतदानाच्या दिवशीच दाखल होणे अपेक्षित होते. मतमोजणीच्या दिवशी अशा तक्रारी ग्राह्य धरता येत नाहीत.
त्यामुळे सहा अर्ज फेटाळण्यात आले. बधे यांनी मते समान कशी पडतात, असा आक्षेप घेत पुनर्मोजणीची मागणी केली होती. त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या दोन केंद्रांवरील मतदान यंत्रांची पुन्हा मोजणी केली असता, आधीच्या व पडताळणीतील मतांमध्ये कोणतीही तफावत आढळली नाही. त्यामुळे मतमोजणी पूर्णपणे योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.





