PMC News – महापालिका प्रशासनाकडून झालेल्या एका चुकीचा फटका नगरसेवक अमोल बालवडकर यांना बसला आहे. बालवडकर यांच्या प्रभागासाठी अंदाजपत्रकात चक्क शून्य निधी आला आहे. आधीच महापालिका निवडणुकीत प्रभाग ९ सूस-बाणेरमधून बालवडकर यांचे तिकीट भाजपने कापल्याने बालवडकर आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाद असतानाच आता सत्ताधारी भाजपनेच बालवडकरांचे बजेट कापल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती. मात्र, पालिकेच्या नगरसचिव विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आल्यानंतर नेमका काय गोंधळ झाला हे लक्षात आल्यानंतर बालवडकर यांना वर्गीकरणाद्वारे निधी देण्याचे आश्वासन भाजपकडून देत या वादावर पडदा टाकण्यात आला. महापालिका निवडणुकीत भाजपकडून बालवडकर यांचे तिकीट कापल्याने भाजप विरोधात बालवडकर असा संघर्ष सुरू आहे. पुणे महापालिका तर तिकीट कापल्यानंतर राष्ट्रवादीत गेलेले बालवडकर निवडून आले असून, त्यांना राष्ट्रवादीचे स्थायी समितीत संधी दिली आहे. स्थायी समितीच्या इतर सदस्यांप्रमाणे बालवडकर यांनी अंदाजपत्रकातील निधीसाठी काही दिवसांपूर्वी प्रस्ताव दिले होते. त्यानंतर, स्थायी समितीच्या अंदाजपत्रकाचे काम बघणाऱ्या नगरसचिव विभागाच्या एका कर्मचाऱ्याकडून या निधीचे प्रस्ताव अंदाजपत्रकासाठी देणे अपेक्षित असताना ते दिलेच गेले नाहीत. विशेष म्हणजे बालवडकर अंदाजपत्रक छपाईला जाण्याच्या एक दिवस आधीपर्यंत त्याबाबत विचारणा करीत होते. तर त्यांना प्रस्ताव पुढे दिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी मुख्यसभेत अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर त्यात बालवडकर यांच्या प्रभागासाठी स यादीत निधीच नसल्याचे समोर आले. त्यांनी तत्काळ आपले गटनेते निलेश निकम यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर, निकम यांनी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली. यावेळी बालवडकर यांचे प्रस्ताव अंदाजपत्रकासाठी संबंधित कर्मचाऱ्याने पाठविलेच नसल्याचे समोर तर या कर्मचाऱ्यानेही आपली चूक सर्वांच्या समोर कबूल केली. त्यानंतर, भाजपकडून बालवडकर यांना निधी देण्याचे आश्वासन देत या गोंधळावर पडदा टाकण्यात आला.