PMC Budget 2026-27 – शहराच्या पुढील पाच वर्षांच्या सर्वांगीण विकासाचा दावा सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना केलेला असला तरी दुसरीकडे मात्र, नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी निधी देताना निधीच्या विषम वाटपाचे सूत्र या अंदाजपत्रकातही कायम असल्याचे समोर आले आहे. अंदाजपत्रकात भाजपच्या नगरसेवकांना प्रभागासाठी सात ते आठ कोटी, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना ४ ते ५ कोटी तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांना ३ ते ४ कोटींचा निधी देण्यात आला असल्याचे समोर आले आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेकडून नुकत्याच नेमण्यात आलेल्या स्वीकृत नगरसेवकांना निधी देतानाही दुजाभाव झाल्याचे अंदाजपत्रकात समोर आले आहे. नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी निधी देण्यासाठी अंदाजपत्रकात स यादी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात, समित्यांचे तसेच स्थायी समितीचे सदस्यांना प्रत्येकी १० ते १५ कोटींचा निधी तसेच प्रभागासाठी काही स्वतंत्र प्रकल्प देण्यात आले आहेत. तर गटनेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी ५० कोटींच्या आसपास निधी देण्यात आला आहे. याशिवाय, आमदारांना विधानसभानिहाय स्वतंत्र निधीही देण्यात आलेला आहे. तर यंदा प्रथमच शहरातील नगरसेवकांपेक्षा महापालिकेत समाविष्ट झालेल्या नवीन ३२ गावांमधील नगरसेवकांना प्रत्येकी १ ते २ कोटींचा जादा निधी विकासकामांसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. स्वीकृत सदस्यांच्या निधीत दुजाभाव स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात यंदा पहिल्यांदाच स्वीकृत सदस्यांना देण्यात येणाऱ्या निधीत दुजाभाव करण्यात आला आहे. भाजपच्या सहा तसेच राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना प्रत्येकी अडीच कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांना दोन कोटींचाच निधी देण्यात आला आहे. याशिवाय, महापौरांना स्वतंत्र २५ कोटींचा महापौर निधीही अंदाजपत्रकात देण्यात आला आहे.