PCMC News : आमचा आवाज का दाबला? राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौरांच्या समोरच भडकले; महापालिकेत गोंधळ
PCMC News : उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप; महापौरांच्या डेस्कसमोर जोरदार घोषणाबाजी.

PCMC News – आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर महापालिका सभेत मंगळवारी (दि. २४) चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. तर, आम्हाला बोलू देत नसल्याचा आरोप करीत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. वारंवार हात वर करूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना बोलू दिले नसल्याने नगरसेवकांनी महापौरांसमोर जात निषेधाच्या घोषणा दिल्या.
महापालिकेच्या विशेष सभेत स्थायी समितीकडून अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सुरुवातीलाच भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी प्रशासनावर टीका केली. दरम्यानच्या कालावधीत महापौर रवी लांडगे उपस्थित नसल्याने उपमहापौर शर्मिला बाबर या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. नढे यांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर बाबर यांनी सातत्याने भाजपच्याच नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली. वारंवार हात वर करूनही महापौर बोलण्याची संधी देत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक संदीप वाघेरे, प्रदीप भालेकर, यश साने, शेखर चिंचवडे, प्रमोद कुटे यांनी महापौर डेस्कसमोर धाव घेतली. तुम्ही फक्त भाजपच्याच नगरसेवकांना बोलण्याची संधी देत असून विरोधकांचा आवाज दाबत आहात असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे काहीकाळ सभागृहात गोंधळाचे वातावऱण झाले होते. सुमारे दहा मिनिट चालेल्या या गोंधळानंतर सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल असे आश्वासन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी दिले. त्यानंतर विरोधकांनी मवाळ भूमिका घेतली.





