Pune Election Results : जिल्हा परिषदेवर ‘घड्याळा’चा गजर! नऊ वर्षांनंतर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; पण खेडमध्ये कुणी दिला ‘धोबीपछाड’?
Pune Election Results : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा 'सुसाट' प्रवास; ७३ पैकी ५१ जागांसह एकहाती सत्ता, भाजप दुसऱ्या तर ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकावर.

Pune Election Results – तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली आहे. जिल्हा परिषदेच्या 73 पैकी 51 जागांवर पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. भाजप दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून 10 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना ठाकरे गट 6, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने 1 जागा मिळाली आहे. हा विजय कार्यकत्याृंनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केला आहे.
पंचायत समिती निवडणुकीत 13 पैकी 9 राष्ट्रवादीकडे, तर शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे गट) व भाजपच्या ताब्यात प्रत्येकी एक पंचायत समिती आली आहे. तर भोर पंचायत समिती राष्ट्रवादी-भाजप (प्रत्येकी चार जागा) टाय झाल्या आहेत. जिल्ह्यात खेड तालुका विशष चर्चेत राहिला तो शिवसेना ठाकरे गटामुळे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देत त्यांनी पंचायत समितीवर सत्ता तर मिळवलीच शिवाय आठ पैकी पाच जिल्हा परिषद गटांवर वर्चस्व मिळवले.
28 जानेवारीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रचार अगदी शांततेत झाला. जाहीर सभांचा धडाका दिसला नाही. इंदापूर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचा फायदा दिसला. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली विकासकामे, सहानुभूती आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय सोपा झाला. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही सभा घेतल्या. जुन्नर तालुका वगळता त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तर दौंड, भोर-मुळशी, पुरंदरमध्ये भत्तजपला काही प्रमाणात यश मिळाले.
जिल्हा परिषद पक्षनिहाय जागा
-राष्ट्रवादी – 51
-भाजप – 10
-शिवसेना (ठाकरे) – 6
-शिवसेना – 5
-राष्ट्रवादी (शप) – 1
-एकूण जागा – 73
विजयानंतर अजितदादांची उणीव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीतील उमेदवार सहयोग सोसायटीत दाखल झाले. सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन या विजयी उमेदवारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. विजयानंतर अजित पवारांची उणीव सगळ्यांना भासल्याचं पाहायला मिळालं.





