Mahesh Shinde: हाता-तोंडाशी आलेली पिके वाचली! आमदार महेश शिंदेंच्या थेट पाठपुराव्याला यश
Mahesh Shinde: आमदार महेश शिंदेंच्या सततच्या पाठपुराव्यामुळे धोम धरणाचे पुराचे पाणी वळवले दुष्काळी भागाकडे; वसना-वांगणा योजनेद्वारे सहा पाझर तलाव फुल्ल.

Mahesh Shinde – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, धोम धरणातून पुरावाटे वाया जाणारे पाणी प्रथमच दुष्काळी भागाकडे वळविण्यात आले आहे. या पाण्यामुळे रुई, आझादपूरसह सहा पाझर तलाव भरून घेण्यात आले आहेत. अरबवाडी तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. एकूणच कोरेगाव तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागातील 35 गावांमधील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून,
हाता-तोंडाशी आलेली पिके वाचण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी दिली. किन्हई येथील पंपगृहातून पाणी उपसा करण्याचा शुभारंभ दि. 16 ऑगस्ट रोजी डॉ. सौ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता. अवघ्या 20 दिवसात सहा पाझर तलाव भरले आहेत. डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, आमदार महेश शिंदे हे भूमिपुत्र असून कोरेगाव तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागातील शेतकर्यांच्या प्रश्नांची त्यांना विशेष काळजी आहे.
गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून हा संपूर्ण भाग हिरवागार करण्याचा त्यांचा निर्धार आहे. धोम धरणातून पुराचे पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर जि. प. सदस्य हणमंतराव जगदाळे यांनी धोम कालव्याद्वारे पाणी आणून वसना-वांगणा योजना कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित यंत्रणेला पत्र देण्यात आले.
त्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून धोम धरणाचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही या कामासाठी मोठी मदत केली, असे डॉ. प्रिया शिंदे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे म्हणाले की, आमदार महेश शिंदे यांनी खर्या अर्थाने वसना-वांगणा उपसा जलसिंचन योजनेला नवसंजीवनी दिली आहे.





