MLA Mahesh Shinde: आमदार महेश शिंदे यांचा वाढदिवस ठरणार खास! पर्यावरणपूरक अन् सामाजिक उपक्रमांचा धडाका
MLA Mahesh Shinde: खटाव निवासस्थान आणि कोरेगावच्या जीतराज मंगल कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार; सत्कार समितीकडून उपस्थित राहण्याचे आवाहन.

MLA Mahesh Shinde – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि जलनायक आमदार महेश शिंदे यांचा वाढदिवस शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त कोरेगाव शहरासह मतदारसंघात दोन दिवस विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमांना पदाधिकारी,
कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार महेशदादा शिंदे सत्कार सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. आमदार महेश शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत मतदारसंघात विकासकामांसोबतच जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देत परिसर हिरवागार करण्याचा संकल्प राबविला आहे.
त्यांच्या कार्यपद्धतीला अनुसरून यंदाही वाढदिवस पर्यावरणपूरक स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मतदार संघातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात येणार असून वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा बुके न आणता विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व समाजोपयोगी वस्तू भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. 7 रोजी सकाळी 9 वाजता चौथाई येथील अंगणवाडी प्रांगणात शहरातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचवेळी कोरेगाव येथील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. 8 रोजी आमदार महेश शिंदे सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत खटाव येथील निवासस्थानी नागरिकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 9.30 या वेळेत कोरेगाव रेल्वेस्टेशन परिसरातील जीतराज मंगल कार्यालय येथे शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोरेगाव रिक्षा युनियनच्यावतीने जुना मोटार स्टँड येथे शहरवासीयांना जिलेबी वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रविवार, दि. 9 रोजी वाढदिवसानिमित्त कोरेगाव ते वर्धनगड अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.




