Abhishek Sharma : २८ मार्चपूर्वीच ऑरेंज आर्मीचा थरार! अभिषेक-इशान जोडीने मैदानावर पाडला २५३ धावांचा पाऊस, पाहा VIDEO
Abhishek Sharma : आयपीएल २०२६ चा बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने मैदानावर धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.

Abhishek Sharma Ishan Kishan SRH Practice Match : आयपीएल २०२६ च्या तयारीसाठी सनरायझर्स हैदराबादने आपल्याच खेळाडूंमध्ये एक सराव सामना खेळवला. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या मुख्य स्पर्धेपूर्वी हैदराबादचे फलंदाज किती दमदार फॉर्ममध्ये आहेत, याचा नमुना या सामन्यात पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाचे नायक अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी या सराव सामन्यात षटकारांची आतिषबाजी केली.
अभिषेक शर्माचा ‘रुद्रावतार’ –
या सराव सामन्यात अभिषेक शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने अधिकच वेग वाढवत मैदानाच्या चारी बाजूंना चौकार आणि षटकारांची बरसात केली. अभिषेकने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ९४ धावांची धडाकेबाज खेळी केली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सने अखेर त्याला बाद केले, मात्र तोपर्यंत हैदराबादने मोठी धावसंख्या उभारली होती.
इशान किशनचा ‘फ्लॉप’ ते ‘टॉप’ प्रवास –
या सामन्याच्या पहिल्या डावात इशान किशन स्वस्तात बाद झाला. तो केवळ १४ चेंडूत १८ धावा करू शकला. मात्र, दुसऱ्या डावात संधी मिळताच त्याने आपली खरी ताकद दाखवून दिली. इशानने अवघ्या २५ चेंडूंमध्ये ७२ धावांची विष्फोटक खेळी साकारली. अभिषेक आणि इशानच्या या फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबाद (SRH-A) संघाने २० षटकांत ९ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला.
हैदराबादची ‘बॅटिंग पॉवर’
यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडे ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन अशी जगातली सर्वात स्फोटक टॉप-ऑर्डर उपलब्ध आहे. सराव सामन्यातील ही कामगिरी पाहता, कोणत्याही गोलंदाजी आक्रमणासमोर २५० हून अधिक धावा करण्याची क्षमता या संघात असल्याचे सिद्ध झाले आहे. २८ मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा हा ‘पॉवर पॅक’ संघ काय चमत्कार करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





