Maharashtra Folk Art: पहाटेचा ‘वासुदेव’ हरवला! स्मार्ट सिटीच्या गदारोळात महाराष्ट्राच्या लोककलेचा सूर मंदावला
Maharashtra Folk Art: पिंपरी-चिंचवडमधील शहरीकरण आणि डिजिटल क्रांतीमुळे वासुदेव, बहुरूपी, डोंबारी आणि गारुडी या पारंपरिक कलाकारांचे अस्तित्व धोक्यात.

Maharashtra Folk Art – पहाटेच्या शांत वातावरणात घुमणारा टाळ-चिपळ्यांचा नाद आता विरळ झाला आहे. “वासुदेव आला हो…” अशी साद घालणारा वासुदेव शहरात क्वचितच दिसतो. स्मार्ट सिटीच्या वेगवान विकासात आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावात महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा आवाज हळूहळू हरवत चालला आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विस्तारलेल्या शहरात ही कला आता लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे सांस्कृतिक वारसा जपण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. एकेकाळी वासुदेव, बहुरूपी, गोंधळी, पिंगळा, डोंबारी आणि गारुडी हे गावागावांत तसेच शहरातील वस्त्यांमध्ये नियमित फिरत असत. त्यांच्या आगमनाने परिसरात वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण होत असे. टाळ-चिपळ्यांच्या तालावर भक्तिगीते, लोकपरंपरा आणि संस्कृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत असे. अनेक कुटुंबे या कलाकारांना धान्य, कपडे किंवा आर्थिक मदत देत असत.
त्याच आधारावर त्यांच्या संसाराची गाडी चालत होती. मात्र, बदलत्या काळाने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. मोबाइल, विविध चॅनेल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मनोरंजनाची साधने घराघरांत पोहोचली आहेत. लोकांचा प्रत्यक्ष लोककलेकडे ओढा कमी झाला आहे. परिणामी पारंपरिक कलाकारांचे उत्पन्न घटले आहे. अनेकांनी हा पिढीजात व्यवसाय सोडला आहे. काही जण मजुरी करत आहेत.
तर काहींनी किरकोळ व्यवसायाचा मार्ग स्वीकारला आहे. आज शहरात वासुदेव, बहुरूपी, गोंधळी, पिंगळा, गारुडी आणि डोंबारी हे कलाकार क्वचितच दिसतात. त्यांच्या कलेची ओळखही नव्या पिढीला राहिलेली नाही. अनेक मुलांनी या कलाकारांना प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचत नसल्याची खंत सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
लोककलावंतांच्या मते, पूर्वी मिळणारा लोकाश्रय आणि राजाश्रय आता जवळपास संपला आहे. शासनाच्या विविध योजना असल्या तरी त्यांचा लाभ तळागाळातील कलाकारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. त्यामुळे या कलेचे जतन करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.





