Footpath Obstruction – पिंपळे सौदागर परिसरातील कोकणे चौक ते जगताप डेअरी या दरम्यानचा पदपथ सध्या धोकादायक बनला आहे. पदपथालगतच्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या थेट सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गावर आल्या आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी आणि सायकलस्वारांची वर्दळ असते. मात्र झाडांच्या फांद्या खाली झुकल्याने पादचाऱ्यांना वाकून चालावे लागत आहे. काही ठिकाणी सायकलस्वारांना मार्ग बदलावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील पदपथांची परिस्थिती सारखीच आहे. अनेक ठिकाणी फांद्या इतक्या वाढल्या आहेत की पदपथच झाकला गेला आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावरून चालण्यास भाग पडत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी सुरक्षित जागा असावी. मात्र सध्या तोच धोकादायक ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ फांद्या छाटून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.