Tomato Farmers Crisis: उत्पादन वाढले, पण भाव पडले ! जुन्नरच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट
Tomato Farmers Crisis: जुन्नर तालुक्यात अनुकूल हवामानामुळे टोमॅटोची बंपर आवक; दरात अचानक ७० टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत.

Tomato Farmers Crisis – जुन्नर तालुक्यात यंदा अनुकूल हवामानामुळे टोमॅटोचे विक्रमी उत्पादन झाले असून शेतांमध्ये समाधानकारक पीक आले आहे. मात्र उत्पादन वाढल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या बाजारभावावर झाला आहे. परिणामी भरघोस उत्पादन असूनही शेतकऱ्यांच्या पदरी अपेक्षित उत्पन्न पडत नसल्याने चिंता वाढली आहे.
यंदा साऊ, अथर्व आणि ६२४२ या सुधारित टोमॅटो वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. या वाणांमुळे पिकाची वाढ चांगली झाली असून दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. हंगामाच्या प्रारंभी टोमॅटोला प्रतिक्रेट तब्बल ९०० रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर हा दर ६०० रुपयांवर आला आणि सध्या तो केवळ १५० ते ३०० रुपयांदरम्यान घसरला आहे.
अचानक झालेल्या या दर घसरणीमुळे काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून उत्पादन चांगले असूनही मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत ते व्यक्त करत आहेत. टोमॅटो लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करावी लागते. एका एकरासाठी साधारण दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.
मशागत, बेड तयार करणे, मल्चिंग, ड्रिप, रोपे, लागवड, मांडव उभारणी, बांधणी, खते, औषधे, फवारणी, तोडणी, वाहतूक आणि मजुरी अशा विविध बाबींवर हा खर्च होतो. त्यामुळे सध्याच्या कमी दरात उत्पादन विकावे लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
उत्पादनात वाढ झाल्यामुळे बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दर स्थिर ठेवण्यासाठी शासकीय स्तरावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. बाजार व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, साठवण सुविधांचा विस्तार करणे आणि टोमॅटो प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
“यंदा टोमॅटोचं उत्पादन चांगलं झालं. परंतु बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे बाजारभाव पूर्णपणे घसरले आहेत. उत्पादनासाठी बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक यांचा खर्च खूप वाढला आहे. परंतु टोमॅटोस मिळणारा दर खर्चही भरून काढत नाही. शेतमालाला किमान उत्पादन खर्च निघेल, असा भाव मिळावा, अशी सरकार व बाजार समितीकडे अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान होत आहे.”
– बाळासाहेब बोऱ्हाडे, टोमॅटो उत्पादक शेतकरी






