PCMC News: “आम्ही काय शहराचा ठेका घेतला आहे का?”; पालिकेत मोशीच्या नगरसेवकांचं डायससमोर आंदोलन
PCMC News: मोशी कचरा डेपोतील जीवघेण्या दुर्घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधी आक्रमक; ४० वर्षांपासूनचा त्रास आता सहन करणार नसल्याचा इशारा.

PCMC News – मोशी कचरा डेपोत दुर्घटना घडली. यात निष्पाप कर्मचाऱ्यांचा जीव गेला. मात्र, या सगळ्या घटननेनंतर तरी कोणी आमच्या मोशीचा विचार केला आहे का? आम्ही काय सगळ्या शहराचा ठेका घेतला आहे का? यापुढे कचरा टाकण्यासाठी शहरात पर्यायी जागा तयार करा. आम्ही एकही कचऱ्याची गाडी मोशीत येऊ देणार नाही. सगळं गाव उभ करतो गाड्या अडवायला…कोण माईचा लाल आडवा येतो… असे म्हणत नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी मोशी कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास विरोध केला.
त्याला मोशीतील सर्वच नगरसेवकांनी दुजोरा देत महापौरांच्या डायससमोर धाव घेत गोंधळ घातला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोशीतील कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेवरून अभूतपूर्व गोंधळ झाला. गेल्या चाळीस वर्षांपासून मोशीमध्ये कचरा टाकत असून पर्यायी जागांचा शोध घेतला नाही. त्यामुळे मोशीमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे राहिले असून मोशीतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यावरून मोशी परिसरातील नगरसेवकांनी यापुढे कचरा मोशीत येऊ न देण्याचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक सचिन तापकीर, निखिल बोऱ्हाडे, सारिका गायकवाड, सारिका बोऱ्हाडे, अर्चना सस्ते, माजी महापौर नितीन काळजे यांनी महापौरांच्या डायससमोर जात पर्यायी व्यवस्था काय करणार हे तातडीने सांगा अशी मागणी केली. यावेळी सचिन तापकीर म्हणाले, पुनावळे कचरा डेपोला कोणी विरोध केला याचा शोध घेतला पाहिजे.
चार-पाच वेळा नगरसेवक असलेले अनेक नेते येथे आहेत, त्यांना कधी वाटले नाही आपण शहरासाठी कचऱ्याची जागा शोधावी. प्रत्येक विधानसभानुसार कचऱ्याचे डेपो करा. अर्चना सस्ते म्हणाल्या, मोशीमध्ये लोकं राहतात जनावरं नाही याचा विचार प्रशासनाने केला आहे का? यापुढे आम्ही कचरा मोशी डेपोत टाकू देणार नाही. आम्हाला ठोस निर्णय हवा आमच्याकडे येणारा कचरा किती दिवसांत बंद होईल हे सांगा.
नगरसेविका सारिका गायकवाड यांनी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीसह घरे देण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, अनेक निष्पाप कर्मचाऱ्यांचे जीव गेले आहेत. त्यांच्या वारसांना पालिकेत कायमस्वरुपी नोकरीला घ्या. तसेच त्यांना एक कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करा. एखाद्या योजनेतून त्यांना घर उपबल्ध करून द्या.
सहा महिन्यांत प्रकल्प सुरू करू – आयुक्त
यावर खुलासा करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, यापुढे आपल्याला मोशी कचरा डेपोवर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला शहरात अनेक ठिकाणी पर्यायी जागा शोधाव्या लागतील. त्याठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभा करता येईल. त्या प्रकल्पाची दुर्गंधी येत नाही. त्याचप्रमाणे सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ड्राय सेंटर उभे करता येतील. त्यामधून सिमेंट तयार होते.
त्यामुळे अनेक कंपन्या पैसे देऊन आपला कचरा घेऊन जातील. बायोगॅस हा एक चांगला पर्याय आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सीएनजी तयार करता येईल. तो एमएनजीएल कंपनी आपल्याकडून घेईल. हे सगळे सुरू करण्यासाठी जागा शोधण्यासाठी किमान सहा महिन्यांचा वेळ लागेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यावर मोशी येथील नगरसेवकांनी आक्षेप घेतला.






