Maharashtra Earthquake : महाराष्ट्रात भूकंपाचे जोरदार धक्के; हिंगोलीत ४.५ रिश्टरचा भूकंप, नांदेडमध्येही हादरे
Maharashtra Earthquake : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (३ ऑक्टोबर २०२६) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Maharashtra Earthquake : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (३ ऑक्टोबर) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या भूकंपाचे धक्के हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील काही भागांतही जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती. (Maharashtra Earthquake)
यापूर्वी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात ३.३ रिश्टर स्केलचा सौम्य धक्का जाणवला होता. या धक्क्याचे केंद्र औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे दोन तासांनी ४.५ रिश्टर स्केलचा जोरदार धक्का जाणवला. (Maharashtra Earthquake)
नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण
भूकंपाचा धक्का जाणवताच हिंगोली आणि नांदेडमधील काही भागांत नागरिक घराबाहेर पडले. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याचे आणि भूगर्भातून गडगडाटासारखा आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा आणि नायगाव तालुक्यांतील काही भागांतही हादरे जाणवल्याचे वृत्त आहे. (Maharashtra Earthquake)
जीवित किंवा वित्तहानी नाही
प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची नोंद नाही. हिंगोली जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Earthquake)
दरम्यान, हिंगोली परिसरात यापूर्वीही अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे आजच्या सलग धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र भूकंपानंतर अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Earthquake)





