Maharashtra Earthquake : महाराष्ट्रात किल्लारीनंतरचा सर्वात मोठा भूकंप? ४.७ तीव्रतेच्या धक्क्याने ‘हे’ ३ जिल्हे हादरले, तज्ज्ञांनी वर्तवली भीती?
Maharashtra Earthquake :

Maharashtra Earthquake : विदर्भ आणि मराठवाडा परिसरात आज सकाळी भूकंपाचे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी साधारण 8 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास वाशिम शहर, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी, नांदेड शहर व परिसर तसेच हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे जमिनीला हलके ते मध्यम धक्के बसल्याची नोंद झाली. काही ठिकाणी भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाजही ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले.
भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ (Maharashtra Earthquake)
छत्रपती संभाजीनगर येथील खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत या भागात भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातील सर्वात मोठी घटना
डॉ. औंधकर यांनी सांगितले की, यापूर्वी या भागात 4.5 तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले होते, मात्र यावेळी तीव्रता अधिक असल्याने सुमारे 30 ते 35 टन ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी काळात भूकंपाचे धक्के वाढत गेले, तर मोठ्या भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra Earthquake : महाराष्ट्रात किल्लारीनंतरचा सर्वात मोठा भूकंप? ४.७ तीव्रतेच्या धक्क्याने ‘हे’ ३ जिल्हे हादरले, तज्ज्ञांनी वर्तवली भीती?
त्यामुळे भूकंपप्रवण क्षेत्राचा सखोल भौगोलिक सर्वेक्षण करून कारणांचा शोध घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 30 ऑक्टोबर 1993 रोजी किल्लारी येथे झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर मराठवाड्यातील ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे. Maharashtra Earthquake
धोका टाळण्यासाठी बांधकामात बदल करणे गरजेचे
तज्ज्ञांच्या मते, या पार्श्वभूमीवर भूकंपरोधक बांधकामाची गरज अधिक अधोरेखित होते. विशेषतः माती व दगडांच्या घरांना धोका अधिक असून, मजबूत आणि नियोजनबद्ध बांधकाम असलेल्या घरांचे नुकसान तुलनेने कमी होते. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी बांधकाम पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.
भूकंपाच्या भूगर्भीय कारणांबाबत बोलताना, जमिनीखालील पाण्याचा साठा, पावसाचे प्रमाण आणि भौगोलिक रचना यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. हैदराबादमधील भूकंपशास्त्र संस्थांच्या मदतीने या भागाचा अभ्यास केल्यास भविष्यातील धोके ओळखता येऊ शकतात.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या लिगो प्रकल्पावरही या भूकंप मालिकेचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला हा भाग भूकंपमुक्त मानला जात होता, मात्र 2020 नंतर येणाऱ्या धक्क्यांमुळे आता या प्रकल्पाबाबत पुन्हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्राण्यांना भूकंपाचे संकेत मिळतात का?
भूकंपाबाबत अचूक पूर्वसूचना देणारी कोणतीही यंत्रणा सध्या उपलब्ध नसल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. मात्र काही प्राणी आणि पक्षी भूकंपाच्या आधी संवेदनशील प्रतिक्रिया देतात, असे निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच, मराठवाड्यातील या धक्क्यांमुळे नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहणे, तसेच प्रशासनाने तातडीने वैज्ञानिक पातळीवर उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरत आहे.
किल्लारीपासून कोयना ते मराठवाडा-विदर्भात धक्क्यांची नोंद
महाराष्ट्रात विविध भागांत वेळोवेळी भूकंपाचे धक्के नोंदवले गेले असून काही घटना अत्यंत विनाशकारी ठरल्या आहेत. 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 6.2 रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्याआधी 1967 मध्ये साताऱ्यातील कोयना परिसरात 6.5 तीव्रतेचा धक्का बसला होता.
अलीकडच्या काळात मराठवाडा व विदर्भातील हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांत सौम्य ते मध्यम भूकंप वारंवार जाणवत आहेत. तसेच पालघर, नाशिक आणि पुणे परिसरातही हलक्या धक्क्यांची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोयना-वारणा पट्टा भूकंपप्रवण असून भूकंपरोधक बांधकाम आणि सतर्कता आवश्यक आहे.





