Maharashtra Heat : थंडावा मिळवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; राज्यात ५ जणांचा बुडून मृत्यू; पिता-पुत्रीसह दोन चिमुकले दगावले
Maharashtra Heat : उष्णतेमुळे पोहायला गेलेल्या ५ जणांचा जुन्नर आणि चंद्रपूर येथे बुडून मृत्यू झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Heat : राज्यात वाढत्या उष्णतेमुळे थंडावा मिळवण्यासाठी पाण्यात उतरणाऱ्या नागरिकांमध्ये दुर्घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि चंद्रपूर येथे अशाच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. (Maharashtra Heat)
जुन्नरमध्ये दोन शाळकरी मित्रांचा अंत
जुन्नर तालुक्यातील एका शेततळ्यात दोन जिवलग मित्र पोहायला गेले होते. मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने दोघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Maharashtra Heat)
चंद्रपूरमध्ये पिता-पुत्रीसह तिघांचा मृत्यू
दुसरी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावात घडली. कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेलेल्या तिघांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये राजू कोडापे (४०), त्यांची मुलगी अर्पिता (१२) आणि भाची प्रियांका मडावी (१४) यांचा समावेश आहे. (Maharashtra Heat)
प्रशासनाचे आवाहन
या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना खोल पाण्यात उतरणे टाळा, मुलांना एकट्याने पोहायला जाऊ देऊ नका, शेततळे, विहिरी, नदी परिसरात विशेष काळजी घ्या, मोठ्यांच्या देखरेखीशिवाय पाण्यात जाणे धोकादायक असा इशारा दिला आहे. तसेच उन्हाच्या तडाख्यात थोडासा दिलासा मिळवण्याचा प्रयत्न अनेकदा जीवघेणा ठरत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Heat)





