Haribhau Pawar: सनईच्या सुरांनी अनेक दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणारे शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिरूर तालुक्यासह संपूर्ण सांगीतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, महाराष्ट्राने एक गुणी आणि निष्ठावंत कलावंत गमावला आहे. हरीभाऊ पवार हे सनई वादनातील एक दिग्गज आणि मान्यवर नाव म्हणून सर्वपरिचित होते. ‘हरि-नाथा’ या दोन भावांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या ताफ्याची ख्याती केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पसरली होती. अत्यंत शिस्तबद्ध वादन, सुरांमधील माधुर्य आणि सांगीतिक परंपरेची जपणूक ही त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये होती. यामुळेच पुणे, अहमदनगर, मुंबई आणि ठाणे यांसारख्या शहरांमधील सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळात त्यांच्या सनईला मोठी मागणी असायची. अनेक दशकांच्या आपल्या प्रवासात हरीभाऊंनी असंख्य विवाहसोहळे, धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक सांस्कृतिक समारंभ आपल्या सुरांनी भारावून टाकले. लग्नकार्य असो वा गावची जत्रा, हरीभाऊंच्या सनईचा सूर उमटल्याशिवाय तो सोहळा अपूर्ण असल्याची भावना आयोजक आणि रसिकांमध्ये असायची. साधी राहणी आणि उच्च कलात्मकता जोपासणाऱ्या हरीभाऊंनी आपल्या कलेद्वारे अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण अधिक संस्मरणीय केले. त्यांच्या निधनामुळे केवळ पवार कुटुंबीयांचेच नव्हे, तर संगीतप्रेमी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. “सनईचा एक सुरेल आवाज कायमचा शांत झाला,” अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सविंदणे परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.