Monsoon Session 2026 : पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले; विधानसभेत १८ तास १० मिनिटांचे रेकॉर्डब्रेक कामकाज
Monsoon Session 2026 : राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. हे अधिवेशन संसदीय इतिहासात एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विक्रमासाठी लक्षात ठेवले जाईल.

Monsoon Session 2026 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले असून, आगामी हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ९ जुलै रोजी विधानसभेचे कामकाज सलग १८ तास १० मिनिटे चालून १० जुलैच्या पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी स्थगित झाले. (Monsoon Session 2026)
त्यामुळे संसदीय कामकाजाचा एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दोन्ही सभागृहांच्या प्रत्यक्ष कामकाजाची सांख्यिकीय माहिती पटलावर ठेवली. (Monsoon Session 2026)
विधानसभेत १४ दिवसांत एकूण १२७ तास ५४ मिनिटे प्रत्यक्ष कामकाज झाले. त्याची रोजची सरासरी ९ तास ८ मिनिटे इतकी होती. या सत्रात मंत्री उपस्थित नसल्यामुळे २५ मिनिटांचा, तर इतर कारणांमुळे ५ मिनिटांचा वेळ वाया गेला. विधानसभेत एकूण २२ शासकीय विधेयके पुरःस्थापित करण्यात आली. (Monsoon Session 2026)
त्यापैकी २१ विधेयके संमत करण्यात आली, तर १ विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले. अशासकीय १२ विधेयके चर्चेअंती मागे घेण्यात आली. तारांकित प्रश्नांच्या ९ हजार ९५ सूचनांपैकी ४१० प्रश्न स्वीकृत झाले आणि ५८ प्रश्नांना प्रत्यक्ष उत्तरे मिळाली. (Monsoon Session 2026)
लक्षवेधीच्या २ हजार ९९८ सूचनांपैकी २९२ स्वीकृत होऊन ६२ सूचनांवर सभागृहात चर्चा झाली. नियम २९३ अन्वये प्राप्त सर्व ५ प्रस्तावांवर चर्चा पार पडली. विधानसभेत आमदारांची जास्तीत जास्त उपस्थिती ८४.९६ टक्के, तर सरासरी उपस्थिती ७५.२६ टक्के इतकी नोंदवली गेली. (Monsoon Session 2026)





