Monsoon Session 2026 : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून; 13 ऑगस्टपर्यंत चालणार, महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा
Monsoon Session 2026 : संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होऊन १३ ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी दिली.

Monsoon Session 2026 : संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होऊन १३ ऑगस्टपर्यंत चालणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी दिली. यंदाचे अधिवेशन मागील वर्षाच्या तुलनेत कमी कालावधीचे असून, सुमारे चार आठवड्यांच्या या अधिवेशनात १९ बैठका होण्याची शक्यता आहे.
रिजिजू यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे पावसाळी अधिवेशन बोलावण्यास मंजुरी दिली आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय महत्त्वाच्या विविध विषयांवर चर्चा, वादविवाद आणि आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत.
गेल्या वर्षी संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान पार पडले होते. त्या तुलनेत यंदाचे अधिवेशन कमी दिवसांचे असणार आहे.
विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी –
पावसाळी अधिवेशनात विविध राष्ट्रीय आणि जनहिताच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला जाब विचारण्याची तयारी काँग्रेससह इंडिया आघाडीने सुरू केली आहे. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, विशेष सखोल मतदार पुनरावलोकन (SIR), परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा, चीन व अमेरिकेशी संबंधित व्यापार विषय, मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन), ‘एक देश-एक निवडणूक’ प्रस्ताव, भ्रष्टाचाराचे आरोप तसेच लोकशाही संस्थांच्या कार्यपद्धतीसंदर्भात सरकारकडून स्पष्टीकरण मागितले जाणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, आगामी अधिवेशनासाठी पक्षाची तयारी सुरू असून, इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी समन्वय साधला जात आहे. राज्यस्तरावरही संघटनात्मक बैठका घेण्यात आल्या असून, संसदेत विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याची रणनीती आखली जात आहे.




