महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलणे टाळले

बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी आपल्या PA व ओएसडींच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तत्काळ स्वीकारला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी आणि संत भगवान बाबा यांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असून मुंडे गुन्हेगार नाहीत, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली होती. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांनी त्यांच्याशी भगवानगडावर जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रकृती बीडघडल्याचे कारण देत त्यांनी बोलणे टाळले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच दबावात आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. मात्र, अखेर महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप व विरोधकांचा दबाव यामुळे राजीनामा द्यावा लागला आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण वैद्यकीय सांगितले आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया दिली होती. धनंजय मुंडे यांनी दिलेले कारण व अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया यात विसंगती दिसून आल्याने देखील संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देणे मात्र टाळले आहे. प्रकृतीचे कारण देत त्यांनी माध्यमांना बोलण्याचे टाळले आहे. काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा असून मुंडे गुन्हेगार नाहीत असे पत्रकार परिषद घेत छातीठोकपणे सांगितले होते. मात्र, आता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे देखील टाळले असल्याचे दिसून आले आहे.
बीड आणि लातूरमध्ये लोकांच्या भावनांचा उद्रेक –
संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर बीड आणि लातूरमध्ये लोकांच्या भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीडमध्ये अपर जिल्हादंडाधिकारी यांनी 3 ते 17 मार्च या कालावधीसाठी मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. सकाळपासून बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांकडूनही बंदला पाठिंबा देण्यात आला. दुसरीकडे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ केजमध्ये नागरिक आक्रमक झाले. धारूर चौकात टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी केली.
संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतप्त झालेल्या तरुणांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या हत्येच्या घटनेतील आरोपींना फाशीची द्यावी, धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी होत आहे.





