धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? छगन भुजबळांसह ‘ही’ नावं चर्चेत

Dhananjay Munde Resignation | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर आता मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आता मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी कोणत्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.
धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या खात्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार? तसेच, मुंडेंच्या जागी कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची जबाबदारी मिळणार? या चर्चांना वेग आला आहे. मुंडेंच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता मुंडेंच्या जागी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भुजबळांसोबतच मंत्रिपदासाठी प्रकाश सोळंके, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांच्या या नेत्यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
दरम्यान, बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा देताना त्यांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली.
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.’, असे म्हणत धनंजय मुंडेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.





