संतोष देशमुख हत्या प्रकरण: … अखेर धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Dhananjay Munde resignation | बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले आहे. त्यानंतर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी देशमुख यांच्या हत्येनंतर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला असून, राजीनामा मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यापूर्वी त्यांची देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे माहिती समोर आली होती.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या फोटोनंतर विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. परंतु, त्यांनी सुरुवातीला राजीनामा देणे टाळले होते.
दरम्यान, पोलिसांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला आरोपीला पहिल्या क्रमांकाचा आरोपी केले आहे. त्यानंतर आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण 1400 पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र केजच्या न्यायालयात दाखल केलं आहे. हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. यावरून विरोधकांकडून सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.




