Mahaganapati Temple Wai: वाईचा कृष्णाकाठ पालख्यांनी फुलला! महागणपती घाटावर भक्तीचा अनोखा संगम
Mahaganapati Temple Wai: भोर, वेल्हा, फलटण भागातील ग्रामदेवतांच्या पालख्या वाईच्या महागणपती घाटावर दाखल; धार्मिक विधी अन् स्नानानंतर गावाकडे रवाना.
Mahaganapati Temple Wai – श्रावणातील शेवटच्या सोमवारचे औचित्य साधून वाईच्या पवित्र कृष्णाकाठावर आज भक्तीचा आणि परंपरेचा अनोखा संगम पाहण्यास मिळाला. तालुक्यासह भोर, वेल्हा, फलटण आदी परिसरातील विविध गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्या ढोल-ताशे, झांज-लेझीमच्या निनादात महागणपती घाटावर दाखल झाल्याने कृष्णाकाठ भक्तिरसात न्हाऊन निघाला. पालख्यांमुळे महागणपती मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
श्रावण महिन्यात ग्रामदेवतांना कृष्णा नदीच्या पवित्र जलाने स्नान घालून महागणपतीचे दर्शन घेण्याची व त्यानंतर पालखी मिरवणुकीने गावाकडे परतण्याची शेकडो वर्षांची प्रथा आहे. यंदाही मांढरदेव, परखंदी, शेलारवाडी, शेंदूरजणे यांसह अनेक गावांच्या ग्रामदेवतांच्या पालख्या सकाळपासूनच ढोल-झांजांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत महागणपती घाटावर दाखल झाल्या.
कृष्णा नदीच्या पवित्र जलात ग्रामदेवतांना विधिवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर पूजाअर्चा, आरती आणि धार्मिक विधी पार पडले. ‘हर हर महादेव’, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने कृष्णाकाठ दुमदुमून गेला. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पालख्या पुन्हा वाजतगाजत गावाकडे रवाना झाल्या. पालखी मिरवणुकीदरम्यान गुलालाने रंगलेले तरुण व ग्रामस्थ ढोल-लेझीमच्या तालावर उत्स्फूर्तपणे नृत्य करीत होते.
या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण वाई शहरात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त वाई येथील काशीविश्वेश्वर, भद्रेश्वर, वाकेश्वर, सिद्धेश्वर आदी महादेव मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरात प्रसाद, मिठाई, बेल-फुले आणि पूजेचे साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती.
मात्र, पालिका प्रशासन व धोम पाटबंधारे विभागाकडून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. कृष्णा नदीत पुरेसे पाणी न सोडल्याने तसेच नदीपात्रातील साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यातच ग्रामदेवतांना स्नान घालण्याची वेळ भाविकांवर आली. त्यानंतर भाविकांनाही त्याच पाण्यात अंघोळ करावी लागल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही बाहेरून आलेल्या भाविकांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, आजचा आठवडा बाजार आणि पालख्यांमुळे वाई शहरात भाविक, ग्रामस्थ तसेच वाहनांची मोठी गर्दी झाली. परिणामी शहरातील विविध मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मात्र, भक्तिभाव, पारंपरिक उत्साह आणि ग्रामदेवतांच्या जयघोषाने वाईचा कृष्णाकाठ दिवसभर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.






