Eco Friendly Ganeshotsav: डीजेचा दणदणाट अन् फटाके बंद! ‘या’ गावातील गणेश मंडळाचा आदर्श घेण्यासारखा निर्णय
Eco Friendly Ganeshotsav: वाढते ध्वनी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामाजिक एकोप्याचा नवा आदर्श.

Eco Friendly Ganeshotsav – गणेशोत्सव म्हटले की जल्लोष, रोषणाई आणि उत्साहाची पर्वणी. मात्र, या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत ‘उत्सव भक्तीचा, संदेश पर्यावरण संवर्धनाचा’ असा उपक्रमाचा आदर्श यंदा वेळे (ता. वाई) येथील रणसंग्राम मित्र परिवाराने घालून दिला आहे. डीजेचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी आणि विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण टाळत डीजे, फटाके आणि जलप्रदूषण मुक्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाने केला आहे.
रणसंग्राम मित्र परिवाराच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावट कामाचा शुभारंभ वास्तुपूजनाने उत्साहात करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुईंज पोलीस ठाण्याच्या ‘गणराया अवॉर्ड’मध्ये सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचा मान मिळविणाऱ्या रणसंग्राम मित्र परिवाराने आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत वाई तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून मंडळाने आपल्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेण्यास भाग पाडले आहे. यंदाही हीच सामाजिक बांधिलकी अधिक व्यापक करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. रणसंग्राम मित्र परिवार १९९८ पासून सामाजिक कार्यात सक्रिय असून गावाच्या विकासासाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे.
गणेशोत्सवातून केवळ मनोरंजन न करता समाजाच्या गरजा ओळखून त्यावर उपयुक्त उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने जपली आहे. दरवर्षी मंडळाद्वारे आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, महिला सक्षमीकरणासाठी फूड फेस्टिव्हल, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान यांसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
त्यामुळे रणसंग्राम मित्र परिवाराचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक जाणीव जागविणारा उपक्रम ठरत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. वाढते ध्वनीप्रदूषण, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि गणेश विसर्जनामुळे निर्माण होणारे जलप्रदूषण याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
यावेळी सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच सिंधू ढमाळ, माजी उपसरपंच उषा पवार, राहुल ननावरे, नीलम नलावडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय नलावडे, दीपक पवार, विजय पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.






