Wai News: ११ तारखेला आरक्षणाचा ‘आर-पार’ लढा! वाई तालुक्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघणार
Wai News: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाईत कडकडीत बंद; दुकाने अन् आस्थापना बंद ठेवून काढली भव्य फेरी.

Wai News – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या वाई बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैद्यकीय सेवा वगळता बहुतांश दुकाने, हॉटेल्स, रस्त्यालगतची दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद राहिल्या. डी-मार्टसह अनेक आस्थापनांनीही बंदला प्रतिसाद दिला.
आंदोलनादरम्यान सकल मराठा समाजाच्यावतीने शहरातून फेरी काढण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी शहर दणाणून गेले. आगामी 11 तारखेला मुंबई येथे होणार्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मराठा समन्वयक अनिल सावंत यांनी कुणबी नोंदी, कुणबी दाखले व गॅझेटच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
आर्थिक अडचणींमुळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, आरक्षणामुळे शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. चरण गायकवाड यांनी 11 तारखेचा मुंबईतील लढा निर्णायक असून, समाजबांधवांनी त्यासाठी तयारी ठेवावी, असे आवाहन केले. गोविंद इथापे यांनी प्रशासनाने कुणबी दाखल्यांबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली.
महिला समन्वयक अल्पना यादव यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण व रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला. काशिनाथ मामा शेलार यांनी माता-भगिनींसह सर्वांनी मुंबई आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. नारायण ढगे यांनी ‘आज नाही तर कधीच नाही’चा निर्धार व्यक्त केला. श्रावणी सोमवारनिमित्त महागणपती परिसरात भाविकांची गर्दी असल्याने त्या परिसरातील दुकाने सुरू ठेवण्यास आंदोलकांनी सूट दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
युवा पिढीसाठी एकजूट गरजेची
मराठा समाजाने येणार्या युवा पिढीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आजचा त्याग उद्याची युवा पिढी घडवणार आहे. मोजकेच मावळे उपस्थित असले तरी वाईतील आंदोलन 100 टक्के यशस्वी झाले.
– काशिनाथ मामा शेलार, मराठा समन्वयक, वाई तालुका
‘नासक्या प्रवृत्तींचा निषेध’
आपल्यातीलच काही प्रवृत्ती मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करीत आहेत. अशा प्रवृत्तींचा जाहीर निषेध करतो. मराठा समाजाने एकत्रित राहून समाजाच्या हितासाठी काम करणे गरजेचे आहे.
– विक्रम वाघ, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय मराठा महासंघ





