Mahabaleshwar Election – महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समितीत वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण वरचष्मा अबाधित राहिला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील ही सत्ता टिकवविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर आतापर्यंत कुणालाही शिरकावही करु न देणाऱ्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किल्ल्याला आता शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणशिंग फुंकलं आहे. या दोघांच्या लढाईत भाजपने सर्व ठिकाणी उमेदवारी देऊन निवडणुकीतील रंगत वाढविली आहे. त्याळे महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील या संघर्षात कोम बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.तळदेव गटातील प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गायकवाड व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील अजित संकपाळ यांच्यात होत आहे. पाटील गट विरुद्ध शिंदे गट अशी ओळख ही लढत निर्माण करत आहे. या लढतीत पराभव म्हणजे केवळ गट गमावणं नाही, तर तालुक्यावरील राजकीय पकड सुटण्याचा धोका आहे. मंत्री मकरंद पाटील यांनी सत्ता टिकवण्यासाठी शेवटचा डाव टाकला आहे. प्रशासकीय पकड, संघटनात्मक ताकद यांमुळे प्रत्येक गटात सत्ता टिकवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे. जिल्हा बँकेचे संचालक राजूशेठ राजपुरे मकरंद पाटील यांचे सेनापती बनून गावोगावी फिरत आहेत. ‘हा सामना हरायचा नाही,’ असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची चर्चा आहे.शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील लढाईत भाजपने संधी साधत तिसरी आघाडी उघडली आहे. माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तालुक्यातील प्रत्येक गटात उमेदवार उभे करत राजकीय गणित साधण्यासाठी कटाक्ष ठेवला आहे. सातारा जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपचा झेंडा हाती घेतल्याने पाटील यांच्या गोटात अस्वस्थता वाढली असल्याचं उघडपणे बोललं जात आहे.कै. बाळासाहेब भिलारे यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. भिलारे कुटुंबीयांनी उघडपणे मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा आधार असली, तरी विरोधकही मोठ्या ताकदीने प्रयत्न करत असल्याचंही चित्र आहे.जिल्हा परिषद व पंचयात समितीच्या या निवडणुकीत विशेष म्हणजे राजूशेठ राजपुरे यांनी स्वतःसाठी एकही जागा मागितली नाही. पण तालुक्यातील प्रत्येक जागेसाठी लढा दिला. ‘सत्ता कुटुंबासाठी नाही, तर पक्षासाठी,’ असा टोला त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वर्चस्वासाठी संघर्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना मकरंद पाटील यांच्या किल्ल्याला भगदाड पाडणार का? मकरंद पाटील डावपेच खेळून सत्ता वाचवणार का? भाजप सगळ्यांचं गणित मोडून सत्ता उलथवणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतदान यंत्रात बंद होणार आहेत. महाबळेश्वर तालुक्यात ही निवडणूक म्हणजे सत्तेसाठी संघर्ष आहे. या संघर्षात वर्चस्व टिकते की गमावते याची उत्सुकता जिल्ह्याला लागून राहिली आहे.