प्रभात वृत्तसेवा वाई – वाई नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) उमेदवार निवड प्रक्रियेत वाई शहराला दिशा देणारे नेतृत्व देण्याचा भर दिला आहे. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून सर्व उमेदवार काम करतील, अशी ग्वाही मदत व पुर्नवसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली.गंगापूर येथील काळभैरवनाथ मंदिरात पक्षाच्यावतीने उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री आ. मकरंद पाटील बाेलत हाेते. यावेळी संजय आप्पा लाेळे, प्रतापराव पवार, रमेश गायकवाड, सचिन फरांदे, भूषण गायकवाड, डी. बी. खरात, नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रा. डाॅ. नितीन कदम, आबा चाेरगे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. मंत्री पाटील म्हणाले, ‘‘विरोधकांकडून उमेदवार बदलत असल्याने परिस्थिती सातत्याने बदलत होती. मात्र, आम्ही वाई शहराला सर्वोत्कृष्ट, सुशिक्षित आणि समाजाभिमुख उमेदवार देण्याचा निर्धार केला होता. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात कार्य केलेल्या अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले. काही माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, अनुभवी कार्यकर्ते तसेच नवीन तरुण नेतृत्वाला संधी देत पक्षाने संतुलित आणि मजबूत पॅनेल उभे केले आहे. विशेष म्हणजे दोन महिला डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. या उमेदवारीला प्राधान्य देऊन पक्षाने महिलांच्या सहभागाला महत्त्व दिले आहे.’’ वाई शहराला पुढील पाच वर्षांचा विकासमार्ग देऊ शकणारे नेतृत्व आम्ही पुढे आणले आहे. उमेदवारांची गुणवत्ता, लोकसेवा आणि वाई शहरासाठी असलेली त्यांची बांधिलकी हेच आमचे प्रमुख निकष होते, असे त्यांनी सांगितले. सर्वांच्या सहमतीने नगराध्यक्षपदासाठी डॉ. नितीन कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि शहराशी असलेली जवळीक या गुणांमुळे पक्षाने हा निर्णय दिला असून वाई शहराला दिशा दिणारा प्रतिनिधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मध्ये सर्वांनीच चांगले काम केले आहे. परंतु, ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना यापुढील काळात कुठे ना कुठे संधी देण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहिल.प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान महत्त्वाचे असून त्यांची कदर केली जाईल आणि पुढील निवडणुका किंवा इतर संघटनात्मक संधींमध्ये त्यांना योग्य ते स्थान दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मागील निवडणुकीत ३१ हजार मतांमध्ये केवळ एका मताने नगराध्यक्षपद हुकले असल्याची आठवण करून देत पाटील म्हणाले की, सर्व उमेदवारांनी नम्रपणे मतदारांना सामाेरे जाऊन आपण केलेलं काम व करणारे काम मतदारांना पटवून देणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीमध्ये कशा पध्दतीने सामाेरे जायचे याबाबत सविस्तर माहिती संजय आप्पा लाेळे यांनी दिली. सचिन फरांदे यांनी प्रचार नियोजनाबाबत माहिती दिली. पक्षाचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.