LSG vs DC : दंड भरला, राडा झाला पण आता दोस्ती झाली! ऋषभ पंतने कसं मिटवलं राठी-राणाचं भांडण? पाहा VIDEO
LSG vs DC : आजच्या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंमधील जुना वाद संपुष्टात आला असून, यामध्ये 'कॅप्टन कुल' ऋषभ पंत याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

LSG vs DC Nitish Rana Digvesh Rathi Fight End : गेल्या वर्षी दिल्ली प्रीमियर लीगदरम्यान (DPL 2025) ज्या वादाने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती, तो वाद आता आयपीएल २०२६ च्या मैदानात मिटला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठी आणि दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू नितीश राणा यांच्यातील कडू आठवणी मागे सारून दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली. या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे श्रेय दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला जात आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
ऑगस्ट २०२५ मध्ये दिल्ली प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि पश्चिम दिल्ली लायन्स आमनेसामने होते. या सामन्यात नितीश राणाने अवघ्या ५५ चेंडूंत १३४ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. मात्र, सामन्यादरम्यान दिग्वेश राठी आणि नितीश राणा यांच्यात मैदानावरच मोठी बाचाबाची झाली होती. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, बीसीसीआयने राठीच्या मॅच फीमधील ८० टक्के आणि राणाच्या ५० टक्के रक्कम दंडात्मक कारवाई म्हणून कापली होती.
पंत आणि कुलदीपची एन्ट्री अन् वातावरण हलकं!
The meet-up the internet ordered 😂 pic.twitter.com/2eDeKETnvB
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 31, 2026
बुधवारी लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर दोन्ही संघ सराव करत होते. लखनऊ सुपर जायंट्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला राठी आणि राणा हसत खेळत चर्चा करताना दिसत आहेत. राठी तिथून जाऊ लागताच ऋषभ पंतने त्याला हटकले आणि विचारले, “तू कुठे चालला आहेस?” त्यानंतर राठी पुन्हा राणपाशी आला. याच दरम्यान कुलदीप यादव तिथे पोहोचला आणि त्याने पंतला गमतीने म्हटले, “खूप ज्ञान दिलं आहेस!” या मजेशीर संवादामुळे मैदानावरचा तणाव निवळला आणि दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन करत जुना वाद मिटवला.
बुधवारी रात्री इकाना स्टेडियमवर या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२६ चा पहिला सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी झालेल्या या मैत्रीपूर्ण वातावरणामुळे चाहत्यांनी ऋषभ पंतचे भरभरून कौतुक केले आहे.





