George Linde : केकेआरविरुद्धच्या विजयानंतर लखनौला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू IPL 2026 मधून बाहेर; ‘या’ खेळाडूची एन्ट्री
George Linde : लखनौ सुपर जायंट्स संघाला केकेआरविरुद्धच्या विजयानंतर मोठा धक्का बसला आहे.

George Linde LSG Replacement IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात गुरुवारी एलएसजीने केकेआरवर मात करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयानंतर काही तासांतच लखनौ संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू आणि मॅच विनर खेळाडू वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. मात्र, लखनौने तातडीने हालचाली करत त्याच्या जागी एका अनुभवी खेळाडूची संघात वर्णी लावली आहे.
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच वानिंदू हसरंगाच्या फिटनेसबाबत साशंकता होती. अखेर, लखनौ सुपर जाएंट्सचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी हसरंगा या हंगामाला मुकणार असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. हसरंगाच्या जागी लखनौने दक्षिण आफ्रिकेचा ३४ वर्षीय डावखुरा फिरकीपटू जॉर्ज लिंडे याला संघात स्थान दिले आहे. लखनौचा पुढील सामना १२ एप्रिल रोजी होणार असून, त्यापूर्वीच लिंडे संघात सामील होण्याची शक्यता आहे.
लिंडेची निवड का ठरली महत्त्वाची?
Lucknow mein swagat hai, George Linde ❤️💙
The Protea all-rounder replaces Wanindu Hasaranga in our squad for #TATAIPL 2026 pic.twitter.com/CZaSypy7ZR
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 10, 2026
हसरंगाचा पर्याय शोधण्यासाठी लखनौने मुजीब उर रहमान आणि लियाम डॉसन यांसारख्या खेळाडूंच्या नावांचा विचार केला होता, परंतु अंतिमतः अनुभवी जॉर्ज लिंडेवर विश्वास दर्शवण्यात आला. लिंडे पहिल्यांदाच आयपीएलचा भाग बनणार असला तरी, त्याच्याकडे टी-२० क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत २५० टी-२० सामन्यांमध्ये २६.१९ च्या सरासरीने २१८ विकेट्स टिपले आहेत.
अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा –
जॉर्ज लिंडे हा केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही उपयुक्त ठरू शकतो. तळाच्या फलंदाजीमध्ये तो स्फोटक फटके मारण्यात माहीर असून टी-२० मध्ये त्याच्या नावावर चार अर्धशतके नोंदवलेली आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ३ कसोटी, ४ वनडे आणि ३७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या समावेशामुळे लखनौच्या फिरकी विभागाला आणि फलंदाजीच्या खोलीला बळकटी मिळणार आहे.





