पंजाबमध्ये LPG टँकरचा स्फोट; २ ठार, १०० हून अधिक जखमी, भयावह व्हिडिओने हाहाकार

LPG Tanker Blast : एलपीजी टँकरचा स्फोटपंजाबमधील होशियारपूर-जालंधर राष्ट्रीय महामार्गावरील मंडियाला गावाजवळ शुक्रवारी (२२ ऑगस्ट) रात्री ११ वाजता एका भयंकर अपघाताने हाहाकार उडाला. एलपीजी गॅसने भरलेल्या टँकरला एका मिनी ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत टँकर पलटी झाला आणि गॅस गळतीमुळे प्रचंड स्फोट झाला.
या स्फोटाने लागलेली आग इतक्या झपाट्याने पसरली की, गावातील १५ दुकाने आणि ४ ते ५ घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
गावात एकच खळबळ
रात्रीच्या सन्नाट्यात घडलेल्या या स्फोटाने मंडियाला गावात एकच खळबळ उडाली. टँकरमधील गॅस गावभर पसरला आणि आग वाऱ्यासारखी भडकली. गावकरी झोपेत असताना अचानक आगीच्या ज्वाळांनी घरांना आणि दुकानांना विळखा घातला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट इतका भयंकर होता की, बॉम्बस्फोट झाल्यासारखे वाटले. गावकरी घाबरून सैरावैरा पळत होते, अनेकांना काय घडले हे समजण्यास वेळ लागला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ होशियारपूर, जालंधर आणि अदमपूर येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
सिव्हिल सर्जन पवन कुमार यांनी सांगितले की, होशियारपूर सिव्हिल रुग्णालयात दोन जण मृत अवस्थेत दाखल झाले, तर १८ ते २० जखमींवर उपचार सुरू आहेत. यापैकी ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना इतर रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.
या स्फोटाची माहिती मिळताच होशियारपूरचे उपायुक्त आशिका जैन आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक संदीप कुमार मलिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ होशियारपूर-जालंधर राष्ट्रीय महामार्ग बंद करून अग्निशामक दलाच्या गाड्या पाचारण केल्या. जालंधर, अदमपूर आणि होशियारपूर येथून आलेल्या अग्निशामक पथकांनी रात्रभर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पहाटेपर्यंत आग काही प्रमाणात आटोक्यात आली असून, सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.
मोठी दुर्घटना टळली
दुर्घटनास्थळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर हिंदुस्तान पेट्रोलियमचा गॅस प्लांट आहे. सुदैवाने आग या प्लांटपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा मोठी आपत्ती घडली असती. उपायुक्त आशिका जैन यांनी सांगितले की, “हा अपघात टँकर आणि मिनी ट्रकच्या धडकेमुळे झाला. या औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित मजूरही जखमी झाले असण्याची शक्यता आहे.





