नवरात्रीत काळाचा घाला ! तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला गेलेल्या मित्रांचा अपघात; 2 ठार, 3 गंभीर

Accident News – तुळजाभवानी देवीचे दर्शन करून गावी निघालेल्या 5 मित्रांच्या कारने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास सोलापूर – सांगोला महामार्गावर घडली आहे.
या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.यासंबंधीच्या वृत्तानुसार, सोलापूर – सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास येथे सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली.
सुखदेव बामणे (40), नैनेश कोरे (31), अनिल शिवानंद (42, रा. नांदणी), सुधीर चौगुले (35 रा.वडगाव), सुरज विभुते (21 रा.कोठली) हे 5 मित्र कारने (एमएच 9 एफबी 3908) तुळजाभवानीच्या दर्शनाला गेले होते.
तिथे दर्शन घेतल्यानंतर ते गावाकडे परत निघाले होते. रस्त्यात सोलापूर – सांगली महामार्गावरील चिंचोली बायपासवर त्यांची कार डाळींबाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला (एमपी 20 झेडएम -9518) पाठीमागून धडकली.
त्यात सुखदेव व नैनेश या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालखी मार्गावर 5 ठार
दुसरीकडे, पंढरपूर – ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेजवळील कारुंडे (ता. माळशिरस ) येथे कार व टेम्पोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली.
राजेश अनिल शहा (वय 55, रा. जंक्शन), दुर्गेश शंकर घोरपडे (वय 28, रा. लासुर्णे), कोमल विशाल काळे (वय 32, रा. शिरसटवाडी), शिवराज विशाल काळे (वय 10, रा. शिरसटवाडी), आकाश दादा लोंढे (वय 25, रा. लासुर्णे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर अश्विनी दुर्गेश घोरपडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.





