परभणीत भीषण अपघात; क्रुझर पलटी झाल्याने 2 जागीच ठार, 12 जण जखमी

परभणी – येथील जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात घडला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.
चारठाणा परिसरातील वळण रस्त्यावर क्रुझर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन पलट्या खात रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेले. यात 12 जण गंभीर जखमी झाले. यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
साईबाबाच्या दर्शनाला गेलेले हिंगोली जिल्ह्यातील कनका गावातील हे भाविक होते. दर्शन घेऊन गावी परतत असताना वळण रस्त्यावर एम.एच. 22 यू 4352 या क्रमांकाच्या क्रुझर जीपचा अपघात झाला.
क्रुझर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन आदळले. यावेळी जीपमधील रुक्मिणी चंदू चाभाडे (वय 35 वर्ष) व दीपक सखाराम जाधव (वय 36 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. इतर 12 भाविक जखमी झाले.
अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्यासह टीमने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.





