Hong Kong airport | धावपट्टीवरून घसरून मालवाहू विमान समुद्रात पडले; हॉंगकॉंगमधील दुर्घटनेत २ ठार

Hong Kong airport | हॉंगकॉंगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरून समुद्रात पडले. यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तुक्रीयेतील एसीटी एअरलाईन्सचे दुबईवरून आलेले हे मालवाहू विमान पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी हॉंगकॉंगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानातील चार कर्मचाऱ्यांना सोडवण्यात आले आणि उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र विमानतळावरील दोन कर्मचारी या दुर्घटनेमध्ये ठार झाले. विमानतळाच्या समुद्राच्या बाजूच्या भिंतीजवळ हे विमान अंशतः समुद्राच्या पाण्यात बुडालेले दृश्य हॉंगकॉंगमधील स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले. विमानाचा पुढील काही भाग आणि कॉकपिट पाण्याबाहेर होते. मात्र शेपटाकडील भागग तुटून वेगळा झाला होता.
अपघातानंतर हॉंगकॉंग विमानतळावरील उत्तरेकडील धावपट्टी बंद करण्यात आली. विमान कंपनी आणि सर्व संबंधितांकडे या अपघाताविषयीची चौकशी करण्यात येत आहे, असे हॉंगकॉंगच्या नागरी हवा वाहतूक विभागाने म्हटले आहे.





